पोलिस आयुक्त म्हणाले, जिल्हाबंदीचे आदेश अद्याप लागू, ई-पास अनिवार्यच

सोलापूर

सोलापूर : सोशल मीडियावर पाच ऑगस्टपासून राज्यात प्रवासाला ई-पासची आवश्‍यकता नाही, अशा प्रकारच्या पोस्ट पसरवणे सुरू आहे. त्याचा त्रास जिल्हा बंदी चेक पोस्टवर असणाऱ्या पोलिसांना होत आहे. अकलूज-सराटी येथे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द येते. त्या ठिकाणी असलेल्या चेक पोस्टवर सोशल मीडियावरून जिल्हा बंदी उठल्याची पोस्ट फिरत असल्याने येणारे – जाणारे वाहनधारक जिल्हा बंदी उठली असताना का अडवता, असा वाद घालताना दिसून येत आहेत. 

या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना मोबाईलवरून विचारणा केली असता ते म्हणाले, राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा बंदीचे आदेश अद्यापही लागू आहेत. जिल्हा बंदीमुळे जिल्ह्यातून किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी ई-पास अनिवार्यच राहणार आहे. अशा संदर्भात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. 

राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आल्यानंतर काही बाबींमध्ये थोड्याफार प्रमाणात सवलती शासनाने दिल्या असल्या, तरी शासनाकडून जिल्हा बंदीबाबत कोणत्याही नव्याने सूचना न आल्याने जिल्हा बंदीचा आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे. तसेच जिथे प्रशासनाकडून कंटेन्मेंट भाग घोषित केला गेला आहे, तिथे पास मंजूर केला जात नाही. मात्र आपत्कालीन स्थिती, कामाची निकडता, कामाचे महत्त्व, वैद्यकीय कारण अशा आवश्‍यकतेनुसार ई-पासेस दिले जात आहेत. 

वाढत्या कोरोना संदर्भाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करून संसर्ग रोखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत व अन्य राज्यांत अत्यंत गरजेच्या कारणास्तव येणे – जाण्याकरिता पोलिसांकडून डिजिटल ई – पासची सुविधा देण्यात आलेली आहे. ऑनलाइन ई – पास मागणी करताना खरी माहिती भरली गेली पाहिजे, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *