सरसकट वीजबिल माफीसाठी सोलापुरात माकपकडून हजारो बिलांची होळी

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीतील साडेतीन महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो वीजबिलांची होळी करण्यात आली. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन पार पाडलं.

20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी मागणी सप्ताह माकपतर्फे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने सोलापूरात 26 ऑगस्ट रोजी माकपचे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्त्वाखाली लॉकडाऊनच्या काळातील सरसकट वीजबिल माफ करा. तसेच 10 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी राज्य शासनाकडे अर्ज दाखल केलेल्या श्रमिकांना तातडीने आर्थिक मदत द्या या प्रमुख मागण्या घेऊन आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांना आलेल्या अवास्तव आणि न परवडणाऱ्या वीजबिल 25 हजार पत्रकांची होळी करुन वीज महावितरण कंपनी आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील उद्योजकांना दर 1 युनिटला 2 रुपये 76 पैसे वीजबिलाची आकारणी तर सर्वसामान्यांना दर 1 युनिटला 7 रुपये वीजबिल आकारणी का केली जाते, असा सवाल माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी उपस्थित केला. या उद्योजकांसाठी राज्य सरकारकडून स्वतःच्या तिजोरीवर ओझे टाकून 800 कोटी रुपये अनुदानपोटी महावितरण कंपनीला अदा केली जाते. ही तफावत महाराष्ट्राला आर्थिक विषमतेकडे नेत असल्याचे देखील नरसय्या आडम म्हणाले. हा हेतूपुरस्सर रचलेला डाव असून 15 हजार कोटी रुपये उद्योजकांना सरकारने पुरवल्याची टीका देखील माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांनी केली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊनचा अयशस्वी प्रयोग केला. या प्रयोगामुळे देशातील सर्व हातावर पोट असणारे श्रमिक, व्यापारी, शेतकरी, छोटे मोठे दुकानदार हे पूर्णतः हतबल झाले. लॉकडाऊनमुळे अनेकांना उपसामारीला सामोरे जावे लागले. शासनाच्या गोदामात हजारो टन अन्नधान्याचा साठा आहे. हा साठा अनेक दिवसांपासून साठवून ठेवल्याने खराब होत आहे. त्याऐवजी तो गरिबांना मोफत पुरवा अशी मागणी माकपची असून सरकार त्यावर अद्याप विचार करत नसल्याची टीका माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *