सोलापूर : वांगरवाडी (ता. बार्शी) येथील नऊ महिन्यांच्या चिमुकल्याच्या खून प्रकरणास आता वेगळेच वळण लागले असून, महिलेने अनैतिक संबंधातून शेजारीच राहणाऱ्या प्रियकराच्या सांगण्यावरून चिमुकला सार्थक तुपे याचा गळा आवळून खून केला, अशी माहिती पुढे येताच प्रियकरास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वांगरवाडी येथे सार्थक तुपे या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा 22 ऑगस्ट रोजी मोबाईल चार्जरच्या वायरने दुपारी दीड वाजता खून करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित महिलेचा दीर आनंद तुपे यांनी घरात चोरट्याने घुसून, चिमुकल्या सार्थकचा खून करून, अश्विनीचे हातपाय बांधून चार ग्रॅमचे मणीमंगळसूत्र घेऊन मकाच्या शेतातून फरार झाला, अशी फिर्याद दिली होती. तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होऊन तपासाची चक्रे फिरायला सुरू झाली होती. सार्थकची आई अश्विनी तुपे (वय 23) हिला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. न्यायालयात उभे करताच अश्विनीला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. होती. दरम्यान, अश्विनीने चिमुकल्याचा खून केल्याचे निष्पन्न होताच या खुनामागे अजून कोणी आहे का? याची पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली. तिला विश्वासात घेऊन, गोपनीय माहितीच्या आधारे विचारताच अश्विनीने शशिकांत ठोंगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. बाळाला सांभाळण्याच्या कामामुळे अनैतिक संबंधास अडथळा येत आहे. बाळ सारखे किरकिर करते, असे शशिकांत ठोंगे अश्विनीला म्हणत असे. यामुळे बाळावरील प्रेम कमी होऊन त्याचा गळा आवळून खून केला, असे अश्विनीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शनिवारी शशिकांत ठोंगे (वय 36, रा. वांगरवाडी) यास अटक करून न्यायालयात उभे केले असता त्याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तपासात आणखी काही निष्पन्न होते का? याबाबत पोलिसांची चौकशी सुरू असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.