आलिया भट्ट पुन्हा एकदा झाली ‘गंगूबाई काठियावाडी’!

ताज्या घडामोडी देशविदेश मनोरंजन

मुंबई, :  Coronavirus च्या संकट काळात सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबलं होतं. पण आता सरकारने परवानगी दिल्यानंतर विविध चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अनेकांनी शूटिंगला सुरुवात केल्यानंतर आता आलिया भट (Alia Bhatt) च्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali) हा चित्रपट असून यामध्ये आलिया भट प्रमुख भूमिका साकारत आहे. 6 महिन्यांच्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. नाईट शिफ्टमध्ये या चित्रपटाचं शूटिंग होणार असून सुरक्षेची देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत आहे.

1 ऑक्टोबरपासून आलियाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शूटिंगच्या सेटवर केवळ 50 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आलिया आणि इतर कलाकारांच्या सुरक्षेचीदेखील मोठी काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या काळात शूटिंग थांबल्याने या चित्रपटाचा सेटदेखील पाडण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. आलिया भटसोबत शांतनू माहेश्वरीदेखील या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात आलिया भट गंगूबाई काठियावाडी या मुंबईतील स्त्रीची भूमिका साकारणार आहे. हुसेन झैदी आणि जेन बोर्जेस या लेखकांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई-स्टोरीज ऑफ विमेन फ्रॉम दि गँगलँड्स’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.

गंगूबाई 60 च्या दशकातील मुंबई माफियांतील एक मोठं नाव होतं. तिला तिच्या पतीने अवघ्या 500 रुपयांत विकलं होतं.  तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात अडकली होती. गंगूबाईने असहाय्य मुलींसाठी बरीच कामंही केली होती. या चित्रपटाच्यानिमित्ताने आलिया भट आणि संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या भूमिकेसाठी सुरुवातीला प्रियांका चोपडाला विचारण्यात आलं होतं. पण तिनी नकार दिल्यानं आलियाला ही भूमिका मिळाली.

आलिया सध्या या चित्रपटाचे शूटिंग करत असून नुकताच तिचा सडक 2 हा चित्रपट ऑनालइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून विरोध करण्यात आला होता. त्याचबरोबर आलिया करण जोहरच्या ब्रह्मास्त्र या सिनेमातही दिसणार आहे. अयान मुखर्जी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. तर आलियासोबत रणबीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर MS राजामौली यांच्या  RRR या सिनेमातून आलिया दाक्षिणात्य सिनेमामध्ये देखील पदार्पण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *