अजित पवारांचा राजकीय बॉम्ब! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : ‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. अवघ्या सहा महिन्यात हे सरकार पडेल, असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, आता पाहा पुढील चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील’, असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय धुराळा उडवून दिला आहे.

विधिमंडळाच्या काल झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरून झालेल्या चर्चेत अजित पवार बोलत होते. भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला.

अजित पवार म्हणाले, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला जनतेनं सपशेल नाकारलं आहे. धुळे-नंदुबारमध्ये भाजपचे उमेदवार अमरिश पटेल हे विजयी ठरले. पटेल हे आमच्याकडून तिकडे गेले आहेत. ते आणि आम्ही समविचारी आहेत. त्यामुळे ते कधी घरवापसी करतील हे, भाजपला कळणारही नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. भाजपचा गड समजला जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यात मात्र महाविकास आघाडीनं मोठं खिंडार पाडलं आहे. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. ही बाब भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, याबाबत भाजपनं आत्मचिंतन करावं, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यांनी सांगितलं की, सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडबाबत सरकारनं काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र त्याबाबत सरकार फेरविचार करत आहे.

अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं आव्हान…

दरम्यान, काल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार यांच्या जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर समोरच बसलेले अजित पवार म्हणाले की, ‘तुमचे आव्हान मी स्वीकारले. मला पाडूनच दाखवा’ असा खुमासदार टोला लगावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *