लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावले जाणार : अजित पवार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावले जाणार आहे. लवकरच याबद्दल नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. पण, ‘लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही’ असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही. पुण्यात ज्या पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहे तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी आहे. त्याबाबत उद्या सोमवारी 8 वाजता निर्णय होईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

‘लॉकडाऊन कोणाला ही नको आहे, पण लोक ऐकत नसतील तर पर्याय नाही, वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही अजितदादा म्हणाले.

‘आताची लाट वेगळी आहे, घरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह  आढळला  तर संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत आहे. ऑक्सिजन कमी पडू नये या साठी सरकारचा प्रयत्न आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी ही चर्चा केली आहे आणि यामध्ये आता कुणीही राजकारण आणू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. पंढरपूरमध्ये केंद्र सरकारने निवडणूक लावलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. केरळ, बंगालमध्ये ही निवडणुका आहेत तर तिथे निर्बंध का नाहीत असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत, पण नियम पाळून प्रचार करावा, अशी सूचना अजित पवारांनी दिली आहे.

गिरीश बापट यांच्या समोर बैठकीत निर्णय झाले होते, आतली चर्चा बाहेर करायची नसते पण सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे, असा टोलाही पवारांनी बापट यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *