पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही : अजित पवार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपली भूमिका मांडली.

बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

जो-तो स्वतंत्र विचाराचा, काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार : अजित पवार
याविषयी अजित पवार म्हणाले की, “माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. आता अलिकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं, तुमच्या मुलाने ते ट्वीट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो-तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला-त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”

सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार : पार्थ पवार
मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट करुन मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *