आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम, पुन्हा जाहीर झाली नवी तारीख

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोनाच्या  (Coronavirus) वाढत्या प्रसारामुळे आंतराराष्ट्रीय उड्डाणांवर (International Flights) पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. विमान नियामक नागरी उड्डाण संचलनालयानं (DGCA) याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रसारामुळे मागील वर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद आहेत.

विमानन नियामक नागरी उड्डाण संचलनालयाच्या मते, भारतातून जाणारी आणि भारतात येणारी आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 मार्च 2021 ला 23 वाजून 59 मिनीटांपर्यंत निलंबित करण्यात आली आहेत. मात्र, काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते. हे नियम मालवाहतूक उड्डाणं आणि डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या उड्डाणांना लागू नसतील.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २७ जानेवारीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी ३१ मार्चपर्यंत लागू राहतील, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी दिला. यासोबतच डीजीसीएनेही पत्रक जारी करत आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.एकूण २४ देशांसोबत भारताने ‘एअर बबल’ करार केला आहे. ‘एअर बबल करारा’नुसार संबंधित दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं करता येऊ शकतात. ‘एअर बबल’द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 16,488 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12771 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजार रुग्ण आढळले आहेत. तर, 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *