‘अलर्ट राहा, भारत अचानक हल्ला करु शकतो’, निवृत्त चिनी जनरलने बोलून दाखवली भीती

ताज्या घडामोडी देशविदेश

भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर चिनी सैन्याने सर्तक राहिले पाहिजे. भारतीय सैन्याकडून अचानक हल्ला होऊ शकतो, असा इशारा चिनी सैन्याच्या निवृत्त जनरलने दिला आहे. भारताने आधीच या भागात दुप्प्ट सैन्य तैनात केले आहे असा दावा या निवृत्त चिनी जनरलने केला आहे.‘ली जियान’ या संरक्षणाशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलेल्या लेखात वँग हाँगगुआंग यांनी हा इशारा दिला आहे. चिनी सैन्यातून निवृत्त झालेले वँग लेफ्टनंट जनरल पदावर होते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले आहे. “नियंत्रण रेषेवर बंदोबस्त ठेवण्यासाठी भारताला ५० हजार सैनिकांची आवश्यकता आहे. पण आता हिवाळयाआधी सैन्य कमी करण्याऐवजी भारताने लडाखमध्ये एक लाख सैनिक तैनात केले आहेत” असे वँग भारत-चीन सीमावादाचा दाखला देताना म्हणाले.

“भारताने त्यांची सैन्य संख्या दुप्पट किंवा तिप्पट केली आहे. चीनच्या हद्दीपासून ५० किलोमीटर अंतरावर ते तैनात आहेत. काही तासात ते चीनमध्ये प्रवेश करु शकतात” असे वँग हाँगगुआंग यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. नानजिंग मिलिट्री रिजनमध्ये वँग उपकमांडर होते. “युद्धाचा धोका वाढला आहे. तैवान स्ट्रेटमधील घटना आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतमुळे भारताला काही तरी मोठ करण्याची संधी मिळू शकते” अशी भीती वँग यांनी आपल्या लेखातून व्यक्त केली आहे.

चीनकडून पहिल्यांदाच कबुली, गलवानमध्ये इतके सैनिक ठार झाल्याचं केलं मान्य
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचेही अनेक सैनिक ठार झाले. पण चीनने अद्यापपर्यंत अधिकृतपणे त्यांचे सैनिक ठार झाल्याचे मान्य केलेलं नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला मोल्डोमध्ये भारत आणि चीनमध्ये लष्करी-मुत्सद्दी पातळीवरील चर्चा झाली. त्यात पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचे मान्य केले. १५ जूनच्या संघर्षात आपले पाच सैनिक ठार झाल्याची कबुली चीनने दिली आहे.

लडाख सीमेवर एप्रिलपासून निर्माण झालेली तणावाची स्थिती अजूनही कायम आहे. उलट पँगाँग सरोवराच्या परिसरात स्थिती जास्त स्फोटक आहे. इथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. आतापर्यंत तीन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीन फिंगर चार वरुन त्यांच्यापूर्वीच्या जागी फिंगर आठवर जायला तयार नाही. त्यामुळे ही संघर्षाची स्थिती आहे. यापुढे लडाख सीमेवर सैन्य संख्या वाढवायची नाही, असे दोन्ही देशांमध्ये ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *