राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना

ताज्या घडामोडी देशविदेश

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. यातील पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आलं आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार  हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिलं आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाल्यावर अंसारी म्हणाले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालं आहे. याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. ते म्हणाले की, मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. त्यांनी म्हटलंय की, कदाचित  भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमि पूजनाचं पहिलं निमंत्रण मला मिळावं, मी याचं स्वागत करतो.

अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून झाली. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन झालं.  उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहील. यात 6 पुजाऱ्यांचा समावेश असेल. तर 5 ऑगस्टला बुधवारी, शुभमुहुर्तावर राममंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या पूजेला देखील मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *