महामारी आली नसती तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं : रणबीर कपूर

ताज्या घडामोडी देशविदेश मनोरंजन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यंदा त्यांच्या रिलेशनशिपवरुन फारच चर्चेत राहिले. दोघे लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाबाबतही सातत्याने चर्चा सुरु असते. जर कोरोव्हायरसची महामारी आली नसती तर दोघांचं आता लग्न झालं असतं. हे स्वत: रणबीर कपूर म्हणाला आहे. त्यामुळे 2021 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकतील अशी शक्यता आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने विविध मुद्द्यांवर बातचीत केली. यावेळी त्याने पहिल्यांदाच जाहीररित्या आलियाचा उल्लेख ‘गर्लफ्रेण्ड’ असा केला. त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “कोविडमुळे यंदा बऱ्याच गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्या नाहीत. जर या महामारीने आमच्या आयुष्यात दखल दिली नसती तर आतापर्यंत आमचं लग्न झालं असतं. मी आता यावर आणखी काही बोलून हे दुर्दैव असल्याचं सांगणार नाही. मी लवकरच माझं हे लक्ष्य पूर्ण करणार आहे.”

या मुलाखतीत रणबीर कपूरने आलियाचं तोंडभरुन कौतुक केलं. तो म्हणाला की, “माझी गर्लफ्रेण्ड आलिया ओव्हरअचिव्हर आहे. तिने गिटारपासून स्क्रीन रायटिंगपर्यंत सगळं शिकलं. तिच्यासमोर मी स्वत:ला अंडरअचिव्हर समजतो.”

रणबीरने या मुलाखतीत त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबाबतही भाष्य केलं. त्यांच्याबद्दल बोलताना तो भावुक झालेला दिसला. ऋषी कपूर यांचं निधन यावर्षीच एप्रिल महिन्यात झालं होतं.

ब्रह्मास्त्रमध्ये आलिया-रणबीर एकत्र दिसणार
आलिया भट आणि रणबीर कपूर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात एकत्र झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचा दिग्दर्शक असून अमिताभ बच्चनही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी चित्रपटाचं बहुतांश काम झालेलं नाही. मात्र निमित्यांनी चित्रपटाचा लोगो यंदा रिलीज केला होता. तिने भागांमध्ये बनत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *