मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? : अजित पवार

ताज्या घडामोडी पुणे

पुणे : “मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. “देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी हा टोला लगावला.

मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, “एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, मी पुन्हा येईन पण म्हणणार नाही, मी पुन्हा जाईन पण म्हणणार नाही…मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन.” चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलंय, वर्षाच्या आतच तुम्ही पुन्हा जाईन म्हणताय. मग काम घेऊन आलेल्या कोथरुडकरांना मी पुन्हा जाणार सांगणार का?”

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पुण्यातील कार्यक्रमात मी कोल्हापूरला परत जाणार असं खेळीमेळीतच चंद्रकांत पाटील वक्तव्य केलं होतं. “पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदारसंघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्याने सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

खडसेंना ईडीची नोटीस आलीय? : अजित पवार
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस असून त्यांना 30 तारखेला चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा आहे. याविषयी विचारलं असता खडसेंना ईडीची नोटीस आलीय का? असा प्रतिप्रश्न अजित पवार विचारला. “मला याबद्दल काही माहिती नाही. बातम्यांमधूनच मला समजलं आहे, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान आपल्याला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *