सोलापूर : पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाची संभाव्य गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्य़ंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. विशेष म्हणजे आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरान येणार असल्याचा अंदाज असल्याने पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, तो त्यांनी स्वीकारला आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून पंढरपुराकडे येणारी एसटी वाहतूक बंद करण्याचा हा प्रस्ताव होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि पंढरपुरातील स्थानिक यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती ग्रामीण पोलिस विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. तर पोलिसांच्या या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर दिली असून, एसटी प्रशासनास तसे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-किर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती. याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरी यांनी केली. त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासनातर्फे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.