‘मुलीच्या बदल्यात मुलगी’ म्हणत पुण्यामध्ये धक्कादायक अपहरणाची घटना

ताज्या घडामोडी पुणे

पुणे : लक्ष्मीपूजन हा दीपावलीचा महत्वाचा दिवस. मात्र याच दिवशी  “मुलीच्या बदल्यात मुलगी” असं म्हणत पुण्यातील (Pune) दाम्पत्याने खेड तालुक्यातील आंभु गावातून एका मुलीचे अपहरण (kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राजगुरुनगर पोलिसांत याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील एक मुलगी खेड तालुक्यातील आंभु गावातील मुलाबरोबर लग्नाच्या हेतूने पळून गेली होती. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास मुलाकडील गावात म्हणजे खेड तालुक्यातील आंभु गावात येऊन मुलीचे अपहरण केले.

यावेळी अपहरण केलेल्या मुलीच्या पालकांना दमबाजी करत सांगितले की, ‘आमची मुलगी तुमच्या मुलाबरोबर पळून गेली आहे, तीला आमच्याकडे सुखरुप पाठवा मगच तुमची मुलगी तुम्हाला परत देऊ’ असे म्हणत जबरदस्तीने मुलीचे आंभु गावातून अपहरण केले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबाने  राजगुरुनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

‘मुलीच्या बदल्यात मुलगी’ असं म्हणत अपहरणाची घटना घडल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांनी पथक तयार करुन पुण्याकडे पाठवले आहे. या घटनेत मुलीचे आंभु गावातून अपहरण करणारी एक महिला व तिचा नातेवाईक या दोघांना राजगुरुनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पळवून नेलेली मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *