सामान्यांसाठी कांद्याचे दर सुखावणारे, तर बळीराजा मात्र हवालदिल; भाव 41 वरुन थेट 19 रुपये किलोवर

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नाशिक : मनमाड, लासलगावसह नाशिकच्या बहुतांश बाजार समित्यात आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. पाच दिवसांपूर्वी ज्या कांद्याला प्रति किलो 41 रुपये भाव मिळाला होता, त्याच कांद्याला आज 19 रुपये किलो भाव मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र आज अचानक भावात मोठी घसरण झाल्याचं पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

आवक कमी होऊन देखील भावात मोठी घसरण का होत आहे असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. इतर राज्यात मागणी कमी झाली असल्याने भाव गडगडल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

सोमवारी प्रति क्विंटल कांदा भाव, जास्तीतजास्त 4101रुपये होता. तर सरासरी 3700 रुपये होता. परंतु आज शनिवारी हाच भाव जास्तीतजास्त 2222 रूपयांवर, तर सरासरी 1800 रुपयांवर पोहचला आहे. कांद्याचा भाव मोठ्या किंमतीने घसरल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.

गेल्या वर्षभरापासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, महापूर, वादळ अशा अनेक आपत्तींना, संकटांना तोंड देत असलेल्या बळीराजाच्या चिंता अद्यापही कमी झालेल्या नाहीत. अनेक संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा कांद्याचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

कांद्याचे भाव यापुढेही भाव सुधारण्याऐवजी पुन्हा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच लाल कांद्याचं पिक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसाठीचे दिवस कठीण असल्याची परिस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *