बाळंतीण महिलेला अ‍ॅम्ब्युलन्समधून नेताना डॉक्टरचं अपहरण, धक्कादायक कारण आलं समोर

महाराष्ट्र

जालना, 3 जानेवारी : एका बाळंतीण व तिच्या नवजात बालकाला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असलेल्या 108 रुग्णवाहिकेला अडवून त्यातील डॉक्टराला चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार परतूर तालुक्यातील रोहिणा शिवारात घडला.परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या एका बाळंतीण महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने त्यांना बिव्हीजी कंपनीच्या 108 रुग्णवाहिकेतून जालना येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेत मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी रुग्णवाहिकेतील डॉ. हिरालाल जाधव (43) यांना चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.रुग्णवाहिका चालकाने पुणे येथील बिव्हीजी कार्यालयास माहिती दिल्याने, बिव्हीजीने प्रथम पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर जालना पोलिसांना माहिती दिल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन गौहर यांच्या नेतृत्वाखाली परतूरचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, राजू काळे, गणेश शिंदे यांनी तातडीने तपासचक्रे फिरविली.

चालकाने दिलेल्या अपहरणकर्त्यांच्या वर्णनानुसार पोलिसांनी शिक्कलकरी मोहल्यात शोध मोहीम सुरू करून अपहृत डॉक्टराची सुटका करून आरोपी जसपालसिंग जुन्नीसह दोघांना अटक करण्यात आली.

अपहरणामागे धक्कादायक कारण

डॉ. जाधव यांनी परतूर येथे ढाबा टाकण्यासाठी 18 महिन्यांपूर्वी 50 हजार रुपये आरोपीकडून व्याजाने घेतले होते. कोरोनामुळे ढाबा बंद पडल्याने हे पैसे देण्यास उशीर झाला होता, त्यातून हे अपहरण नाट्य घडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *