तरुणाई करतेय स्मशानभूमीत श्रमदान,-अंतिम प्रवास सुखाचा करण्यासाठी प्रयत्न

ताज्या घडामोडी सामाजिक सोलापूर


-अतुल्य सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

सोलापूर

अायुष्यातील अखेरचा विसावा घेण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. प्रत्येकाला या ठिकाणी यायचे असते पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. शहरातील काही तरुण एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून स्मशानभूमी स्वच्छता करण्याचे काम करतात. अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून कोणताही खंड न पडू देता हे तरूण एकत्र येऊन अक्कलकोट रोड परिसरातील स्मशानभूमीत श्रमदान करतात. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नामुळे स्मशानभूमिचे रुपडे बदलण्यास मदत होत आहे.

अंगात निळ्या रंगाचा स्वच्छ भारत अभियानाचा लोगो असलेला टी शर्ट घालून सकाळी सात वाजता हे युवक स्मशानभूमीत हजर असतात. दर रविवारी हे तरुण सकाळी सात ते दहा या वेळेत
शांतीधाम स्मशानभूमीत सेवा देतात. हातात फावडा, कुर्‍हाड, झाडू, टोपली, सत्तूर हाती घेऊन  स्वच्छता करण्यात सगळेच मग्न असतात. येथे स्वखर्चाने वृक्षारोपण करणे, कुंपण बांधणे, पाणी घालणे, राखू उचलून टाकणे, अत्यंविधीच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे, परिसर झाडून स्वच्छ करण्याचे काम हे युवक करतात.

प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास यन्नम सांगतात की, “आम्ही एक दिवस स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलो होतो. त्यावेळी या स्मशानभूमीत ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले होते. तेव्हा येथील परिसर निसर्गरम्य असावा असे आम्हाला वाटू लागले त्यासाठी आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन प्रयत्न करू लागलो. येथील परिस्थिती आज अनेकांच्या प्रयत्नामुळे बदलत आहे.
स्मशानभूमीत शंभरपेक्षा जास्त देशी झाडे लावून परिसर हिरवागार केला आहे. अाज काटेरी झुडपांनी वर्षानुवर्षे वेढलेल्या समाधींनी मोकळा श्वास घेतला.”

नरेंद्र भंडारी सांगतो, “जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो. जन्माचे स्वागत ज्या पद्धतीने केले जाते, तसाच त्याचा अंतिम प्रवाससुद्धा सुखाचा ठरावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे आम्ही येथे रविवारी श्रमदान करतो. पद्मशाली ज्ञाती संस्थेला ही स्मशानभूमी अाम्हाला दत्तक देण्यासाठी मागणी केली आहे.
सतीश गुंडाला, प्रशांत कुडक्याल, नरेंद्र भंडारी, सतीश पोला, आनंद रव्वा, बालराज राजगिरी, वेणुगोपाल कोडम, प्रथमेश रापोल, अमित सरवदे, रामू यन्न्नम, अर्जुन कोंतम, रवी कोंडा हे सर्वजण या स्मशानभूमीत श्रमदान करतात.”

\\\\\\\

बांबूचा असाही उपयोग. . .

अंत्यविधीसाठी लागणारे बांबू विधीनंतर लोक येथेच फेकून देतात. अशा टाकाऊ बांबूचा उपयोग झाडांभोवती कुंपण बांधण्यासाठी करतात. तरुणांचा हा उपक्रम पाहून अंत्यविधीसाठी येणारे लोक यांचे कौतुक केल्याशिवाय राहात नाहीत.

\\\\\\\\\\\\\

परिसरात केली रंगरंगोटी

अत्युल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वखर्चाने स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी केली अाहे. अत्यंविधीसाठी येणार्‍या लोकांना बसण्यासाठी तयार करण्यात अालेल्या कट्ट्यांना रंग देण्यात अाला अाहे. त्यामुळे परिसर सुशोभीत झाले अाहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *